जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचा विस्तार झपाट्याने होत असला तरी, अनेक जुन्या रहिवासी भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. सुंदर मोती नगर परिसरातील शंभर फुटी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याच मुद्द्यावरून संतप्त नागरिकांनी आ.सुरेश भोळे यांना घेराव घालून जाब विचारला. रस्ते, गटारी आणि पथदिव्यांच्या अभावामुळे नागरिकांना अक्षरशः घाणीच्या साम्राज्यातून मार्ग काढावा लागत आहे.
सुंदर मोती नगर परिसरातील शंभर फुटी रस्ता एकेकाळी जळगाव शहराचे गतवैभव मानला जात असे, मात्र आज त्याच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ते, गटारी आणि विजेच्या सोयीअभावी नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्यामुळे या भागात वाळूची अवैध वाहतूक वाढली असून, चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
याच परिसरातील नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांना रस्त्यावर बोलावून त्यांना या समस्येबद्दल विचारणा केली. यापूर्वी, निवडणुकीच्या तोंडावर या रस्त्याचे काम मंजूर झाल्याची आणि लवकरच ते मार्गी लागणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याचा कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमदारांनी नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
आमदार भोळे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, या रस्त्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल. जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील हा शंभर फुटी रस्ता लवकरच मंजूर करून तात्पुरता मुरूम टाकून तो नागरिकांसाठी सुकर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मात्र, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून विचारणा केली असता, त्या अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत कोणताही प्रस्ताव महापालिकेकडे आलेला नाही किंवा त्याची मंजुरी मिळालेली नाही. हा १०० फुटी रस्ता असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली, ज्यामुळे नागरिकांचा संभ्रम वाढला आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.