न्यूयॉर्क वृत्तसंस्था । न्यूयॉर्क येथे आशिया सोसायटी या सांस्कृतिक संघटनेच्या कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. ते म्हणाले, पाकिस्तानशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. मात्र, दहशतवादांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास तयार नसल्याचं ते म्हणाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, काश्मीरची समस्या वाढवण्यासाठीच पाकिस्तानने दहशतवाद्यांची फॅक्ट्री निर्माण केली आहे. त्यामुळे पाकिस्तानशी चर्चा करण्यास कोणतीही अडचण नाही, टेररिस्तानशी चर्चा करण्यास आमचा विरोध आहे, असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात आल्यानंतर पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर जगाचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती निराशेशिवाय काहीही लागलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर परिसरात निर्माण केलेला दहशतवादाचा उद्योग नेस्तनाबूत होणार असल्याने पाकिस्तानला नैराश्य आल्याची टीका त्यांनी केली.