दूषित पाण्यावर त्वरीत उपाययोजना करा : पालकमंत्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले असून, त्यामुळे ग्रामस्थांनां शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी तातडीने दखल घेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती जाणून घेवून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही भूजल विभागाने जिल्ह्यातील १४८७ गावांतील २५०७ पाणीस्रोतांची तपासणी केली. या तपासणीत १७१ गावांमधील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. या स्थितीची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आणि तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी “शुद्ध पाणी, सुरक्षित आरोग्य” हे शासनाचे धोरण अंमलबजावणी साठी तात्काळ उपाय योजना करण्यासाठी दूषित जलस्रोतांचे पुन्हा नमुने घेऊन तातडीने परीक्षण करण्याचे तसेच सध्या १०७ गावांमधील २०५ जलस्रोत बंद करून पर्यायी स्रोताद्वारे त्या गावांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा याबाबत सूचना दिल्या.

गावातील पाणीपुरवठा टाक्या व जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करून परिसर स्वच्छ करण्यात यावा. प्रत्येक ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेवून टीसीएलचा वापर करून पाणी स्वच्छ करण्यास प्राधान्य द्यावे. पाणीपुरवठा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींसोबत समन्वय ठेवून तातडीने उपाय योजनांबाबत अंमलबजावणी करावी. विशेषतः शेतकरी बांधवांनी नायट्रेट प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेता पारंपारिक युरियाचा कमी वापर करून केंद्र सरकारने अनुमोदित केलेल्या नॅनो युरियाचा वापर वाढवावा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ देता कामा नये. प्रशासनाने तातडीने कारवाई करून जलस्रोत सुधारावेत.” असे निर्देश दिले.

Protected Content