Home Cities यावल प्रभाग क्रमांक २ मध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा – नगरसेविका अंजुम खान 

प्रभाग क्रमांक २ मध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा – नगरसेविका अंजुम खान 

0
8

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नगरसेविका अंजुम बी. कदीर खान यांनी यावल नगर परिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे.

नगरसेविका अंजुम खान यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्ड क्रमांक २ मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, या कुत्र्यांनी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांच्या कळपांमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांना दैनंदिन हालचाली करतानाही असुरक्षित वाटत आहे. निवेदनानुसार, या भटक्या कुत्र्यांनी अनेक कोंबड्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले असून, काही कोंबड्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच एका बोकडावरही हल्ला झाल्यामुळे संबंधित पशुपालकाचे सुमारे ११ हजार रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समस्या केवळ नागरिकांच्या सुरक्षिततेपुरती मर्यादित नसून पशुपालकांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे सांगण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होत असून, भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका अंजुम खान यांनी केली आहे.

मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात वॉर्ड क्रमांक २ मधील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे नियमानुसार योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, यावल शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असून, नगर परिषद प्रशासन या मागणीवर कितपत तातडीने कार्यवाही करते, याकडे आता प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound