मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कुऱ्हा-जोंधनखेडा धरणाच्या उंचीवाढ प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंजुरी मिळूनही अनेक दिवसांपासून रखडलेल्या या कामाचा मुद्दा आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देत प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले की, प्रकल्पाअंतर्गत माती धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून, सध्या सांडव्याची उंची वाढविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र कामादरम्यान सांडव्याच्या पायाची पातळी अंदाजे १.५ मीटर अधिक खोल गेल्याने खोदाई आणि संधानकामाच्या परिमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त कामासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाढीव कामासाठी ‘तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता’ मिळविण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामाला अधिक वेग मिळणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे प्रशासकीय हालचालींना गती मिळाल्याची चर्चा परिसरात होत आहे. धरण प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थेचाही टप्प्याटप्प्याने विकास केला जात असून, मुख्य कालव्याचे १.८० किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाल्याची माहितीही शासनाने दिली आहे. उर्वरित वितरण प्रणालीचे कामही लवकर पूर्ण करण्यावर संबंधित विभागाचा भर असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कुऱ्हा-जोंधनखेडा धरणाची उंची वाढल्यानंतर जलसाठ्यात वाढ होणार असून, मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी सिंचन सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता वाढून शेती उत्पादनात वाढ, दुबार पिकांना चालना तसेच परिसरातील जलसुरक्षाही मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला असून, उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. धरण प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास कृषी विकासाला मोठी चालना मिळेल, असे मतही व्यक्त होत आहे.



