वसुलीसंदर्भात कार्यवाही न करण्याऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करा – जि.प.सदस्यांची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत ‘वसुलीसंदर्भात ठोस कार्यवाही न करणाऱ्या अधिकार्‍यांचा गोपनिय अहवाल मागवून सीईओंनी त्यांच्यावर कारवाई करावी’ अशी मागणी केली.

डीव्हीडीएफचे ३० कोटी, पाणी पुरवठ्याचे २६ कोटी, जि.प.गाळ्यांचे १५ कोटी अशी जिल्हा परिषदेची ७१ कोटींची थकबाकी व व्याज असा एकूण शंभर कोटींवर आकडा गेला आहे. तरीही बीडिओ,ग्रामसेवक आणि कार्यकारी अभियंत्यांकडून कोणतीही वसुलीसंदर्भात ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच या संबंधित अधिकार्‍यांचा गोपनिय अहवाल मागवून सीईओंनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि.४ फेब्रुवारी रोजी सानेगुरुजी सभागृहात ऑफलाईन घेण्यात आली. या सभेला जि.प.समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्जवला म्हाळके, सीईओ डॉ.पंकज आशिया, उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार आदी उपस्थित होते.

जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प.गाळे अन् डीव्हीडीएफ अशी शंभर कोटींवर थकबाकी असल्याने जिल्हा परिषदेचा बजेट १२ ते १५ कोयींवर जातोय. विविध विभागांच्या वसुलीसंदर्भात वेळोवेळी सदस्यांनी ठराव करुनही कार्यवाही केली जात नसल्याने जिल्हा परिषद कोमात जाण्याची भिती सदस्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेची मालमत्ता कोठे आहे, याविषयी अधिकारीच अनभिज्ञ आहे. ‘अंधेरी नगरी चौपट राजा’ असा जिल्हा परिषदेचा कारभार सुरु असल्याचा आरोप जि.प.सदस्य नाना महाजन यांनी केला. सिंचन विहिरी व गोठाशेडची प्रकरणे काही तालुक्यात प्रलंबित आहेत. बिडिओंकडून टाळाटाळ केली जात आहे. याविषयी मधुकर काटे, नाना महाजन यांनी आवाज उठविला. त्यावर सीईओंनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्याचे आश्‍वासन दिले.

जिल्ह्यतील सहा तालुक्यात जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले असून त्यापैकी १० सुरु आहेत, तर ४२ सोलर पॅनल बंद अवस्थेत आहेत. या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सीईओंनी तांत्रिक विभागाचे अभियंता मोरे यांच्याकडे चौकशी दिली.

औषध खरेदीचा घोळ संदर्भात नाराजी –

जि.प.आरोग्य विभागात औषध खरेदी प्रक्रिया रेंगाळल्यावरुन सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर सीईओंनी टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर राबवून तातडीने औषधी खरेदी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.

वाकोद पुलाचे निकृष्ट कामाबाबत चौकशी’ची मागणी –

‘वाकोद गावाजवळील पुलाचे बोगस कामे करण्यात आली असून त्याची चौकशी’ची मागणी जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी केली. त्यावर कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांनी, ‘या कामाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल’ असे सूचित केले.

Protected Content