ताडोबा व्याघ्र सफारीचे दर महागले

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची व्याघ्र सफारी व पर्यटन आता पर्यटकांसाठी महागडे झाले आहे. ताडोबा व्यवस्थापनाने कोअर झोनमधील प्रवेश शुल्कात वाढ केली आहे. ताडोबाच्या कोअर झोनमध्ये व्याघ्र पर्यटन सफारी बुकींग करणाऱ्या पर्यटकांसाठी २०० अतिरिक्त शुल्कवाढ करण्यात आली आहे. मात्र, त्या बदल्यात बुकिंग करणाऱ्या ६ पर्यटकांना विसापूर येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये प्रति वाहन २०० रूपये वाढ करण्यात आली आहे.

ताडोबामध्ये १२५ वाहनांना परवानगी आहे. सकाळ व दुपारच्या सत्रात एकूण २५० वाहनांना परवानगी दिली जाते. प्रतिवाहन २०० रूपये वाढविण्यात आल्याने प्रतिदिवस ५० हजार रूपये आणि दरमहा १५ लाख व वर्षांला १.८० कोटी रूपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

२०० रूपये शुल्क वाढीने ताडोबाला वर्षभरात १.८० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. या उत्पनातून बोटॅनिकल गार्डनच्या देखभाल, दुरूस्ती केली जाणार असल्याचा आरोप पर्यटक करत आहेत. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी प्रवेश शुल्क वाढ केल्याचे मान्य केले. मात्र, या शुल्क वाढीचा बोटॅनिकल गार्डनच्या देखभाल, दुरूस्तीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content