तब्बल 21 वर्षांपासून फरार आरोपीस अटक

parola news 3

जळगाव प्रतिनिधी । अपघातात एकाचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार संशयित आरोपीला तब्बल 21 वर्षांनंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरेंद्र उर्फ शिवाजी विष्णु विटेकर (वय-50) रा. नांदुरा ता. राहता जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, 18 नोव्हेबर 1998 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास धुळे-पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील कडजी गावाजवळ‍ शिवाजी विटेकर याने मिनीट्रक क्रमांक (एमपी 12 बी 1586) भरधाव वेगाने घेवून जात असतांना समोरून येणाऱ्या रिक्षा क्रमांक एमडब्ल्यूडी 1741 ला जोरदार धडक दिली होती. यात शरद भगवान सोनार (वय-22) रा. फागणे ता.जि.धुळे यांचा मृत्यू झाला होता. तर दिपक वसंत सोनार आणि काशिनाथ सुरेश चौधरी हे गंभीर जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर संशयित आरोपी शिवाजी विटकर हा फरार झाला होता. त्याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी पो.ना. प्रमोद लाडवंजारी, पो.ना. किरण धनगर यांनी संशयित आरोपीस गुप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील खंडवा येथून संशयित आरोपी शिवाजी विटकर यांना अटक केली.

दरम्यान, संशयित आरोपी शिवाजी विटकर हा मुळ अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील रहिवाशी आहे. अपघात घडल्यापासून त्याने गाव देखील सोडले होते. यापुर्वी त्याने मध्यप्रदेशात एका जिल्हाधिकारी यांच्या गाडीचा चालक म्हणून देखील नोकरी केली. नोकरीच्या काळात झारखंड या राज्याच्या निर्मिती झाल्यानंतर त्याची नियुक्ती झारखंड राज्यात करण्यात आली होती. या कारणामुळे त्याने सरकारी नोरकीचा राजीनामा दिला होता. त्याने आपले नाव शिवाजी वरून शिवा ठेवून मध्यप्रदेशातील खंडवा येथे काही दिवस ट्रान्सपोर्ट, खादाणीवर काम करत होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या गावी जावून संशयित आरोपीची माहिती घेवून खंडवा येथे रवाना झाले. खंडवा येथे आठ दिवस थांबून शिवाची अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याजवळी आधारकार्ड आणि काही कागदपत्राच्या अधारे त्याचे खरे नाव शिवाजी विटकर असल्याचे निष्पन्न झाले.

Protected Content