संजय राऊतांकडून इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे

images 1537252983670 239470 sanjay raut

मुंबई प्रतिनिधी । माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कुख्यात गुंड करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेले वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. ‘इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो’, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘खरंतर काँग्रेसच्या मंडळींनी माझं वक्तव्य मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. मी आजवर अनेकदा इंदिरा गांधी यांच्या भूमिकांचे समर्थन केलेले आहे. तरीही माझ्या वक्तव्याने इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तडा गेला असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.

‘मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होते. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या,’ असे वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. त्यामुळे अखेर राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.

Protected Content