अनेकपदरी मास्कमुळे विषाणूप्रसारास प्रतिबंध

 

 

बेंगळुरू : वृत्तसंस्था । अनेकपदरी मुखपट्टीमुळे ‘एरोसोल’ची निर्मिती कमी होऊन विषाणूचा प्रसार टळतो, असे बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संशोधनात म्हटले आहे.

 

हा अभ्यास सँडियागोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मदतीने करण्यात आला असून त्यात टोरांटो अभियांत्रिकी विद्यापीठही सहभागी आहे.

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसने म्हटले आहे, की जेव्हा एखादी व्यक्ती खोकर्ते किंवा शिंकते तेव्हा कफाचे कण २०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे असतात. ते मुखपट्टीच्या पृष्ठभागावर आपटतात. ते वेगाने आपटून मुखपट्टीच्या धाग्यातून आरपार जाऊ शकतात. आपटल्यानंतर त्यांचे आणखी छोटे कण तयार तयार झाल्याने ते अडथळे तोडून बाहेर जाऊ शकतात. त्यातून विषाणूचा प्रसार होतो. हाय स्पीड कॅमेऱ्याच्या मदतीने असे दिसून आले, की लोक जेव्हा शिंकतात किंवा खोकतात तेव्हा कफाचे कण एकेरी, दुहेरी व बहुस्तरीय मुखपट्टीतून वेगवेगळ्या प्रकारे जातात. एकेरी व दुहेरी मुखपट्ट्यांमध्ये मूळ कण १०० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे असतात. ते एरोसोलमध्ये रूपांतरित होऊ शकतात. ते हवेत बराच काळ राहू शकतात व त्यामुळे संसर्ग होतो.

 

मेकॅनिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक सप्तर्षी बसू यांनी सांगितले, की तुम्हाला मुखपट्टीने संरक्षण मिळते, पण तुमच्या आजूबाजूला असलेल्यांना ते मिळत नाही. तिहेरी कापडाची मुूखपट्टी किंवा एन ९५ मुखपट्टी यातून कणांचे आणखी उपकण तयार होण्याची प्रक्रिया टळते. त्यामुळे इतरांनाही संरक्षण मिळते. जेव्हा अशा मुखपट्ट्या अनुपलब्ध असतात तेव्हा एकेरी मुखपट्टी वापरली जाते, त्यातून संरक्षण मिळते. त्यामुळे त्याचाही वापर करावा. मुखपट्टीमुळे विषाणूंचा प्रसार रोखला  जातो. कारण मोठे कण अडवले जातात व त्यामुूळे त्यांचे रुपांतर एरोसोलमध्ये होत नाही. पण हे काही वेळा कापडावरही अवलंबून असते. जर त्याची छिद्रे मोठी असतील तर मुखपट्टीचा फारसा उपयोग होत नाही. काही वेळा मुखपट्टीतूनही कण बाहेर जातात. पण त्याची आणखी छोटे कण तयार करण्याची प्रक्रिया मात्र टळते.

 

मानवी कफाच्या जागी यात म्युसिन, पाणी  व मीठ तसेच फॉस्फोलिपिडचा कफ यांच्या मिश्रणाचा  फवाऱ्यासारखा वापर करण्यात आला, असे पीएचडीचा विद्यार्थी शुभम शर्मा याने सांगितले. तो म्हणाला की, यातून २०० मायक्रॉन ते १.२ एमएमचे कण तयार झाले. त्यानंतर चमूने पल्सड लेसरचा वापर करून कणांच्या सावल्या दिसण्याची व्यवस्था केली. त्यावरून कॅमेरा झूम केला, त्यातून प्रतिमाचित्रण करण्यात आले. सेकंदाला २० हजार छायाचित्रे काढण्यात आली. सर्जिकल मुखपट्टीपासून स्थानिक कापडाच्या मुखपट्टीपर्यंत चाचण्या करण्यात आल्या. कण किती वेगाने जातात, कुठल्या कोनातून सरकतात, याचा अभ्यास करण्यात आला.

 

एकस्तरीय मुखपट्टीत केवळ ३० टक्के कण रोखले जातात. दुहेरी मुखपट्टीत ९१ टक्के कण रोखले जातात पण यात आणखी उपकण होतात, ते एरोसोलसारखे असतात. कण प्रसारण व निर्मिती ही तिहेरी मुखपट्टी व एन ९५ मुखपट्टीत कमी असते.  प्रदीप्त पद्धतीने नॅनोकण तपासून कफाचे कण छिद्रात कसे अडकतात याचा अभ्यास करण्यात आला. यातून केवळ कोविड १९ नव्हे, तर इतर श्वसनरोगांच्या प्रसाराचा प्रतिबंध करण्यात लाभ होईल असे बसू यांनी सांगितले.

 

Protected Content