सावदा ग्रामीण रुग्णालयाच्या नावासाठी १९ मे रोजी लाक्षणिक उपोषण!


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाला ‘राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय’ असे नाव देण्याच्या मागणीसाठी आता मोठे आंदोलन उभे राहणार आहे. या मागणीकडे प्रशासन आणि जिल्हा शल्य चिकित्सक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, या निषेधार्थ सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामीण रुग्णालयासमोर, स्टेशन रोड, सावदा येथे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

नगरपालिकेने या रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक या ठरावाला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करत, हे उपोषण महाराजांच्या सन्मानासाठी असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या लाक्षणिक उपोषणात भारतीय जनता पार्टी (भाजपा), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तसेच शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संयोजकांनी या आंदोलनात सर्वांना एकत्र येऊन महाराजांप्रती आपली निष्ठा दर्शवण्याचे आवाहन केले आहे.

या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव रुग्णालयाला न दिल्यास, हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता प्रशासन या भूमिकेवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.