भुसावळ तहसील कार्यालयातील पत्रे हलवली, विक्री नाही; तहसीलदारांचा खुलासा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूमवरील जुन्या पत्र्यांच्या विक्रीवरून निर्माण झालेल्या आरोपांचे खंडण खुद्द तहसीलदार नीता लबडे यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. सानप यांचा आरोप प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भुसावळ तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या स्ट्राँग रूमवरील पत्रे बदलण्यात आली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते केदार सानप यांनी असा आरोप केला होता की, नवीन पत्रे लावल्यानंतर निघालेल्या जुन्या पत्र्यांची कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता परस्पर विक्री करण्यात आली. त्यांनी यासंदर्भात प्रांत प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. माध्यमांशी बोलताना सानप यांनी असा दावाही केला होता की, तक्रार दाखल झाल्यानंतर ही पत्रे पुन्हा जुन्या तहसील कार्यालयात आणून ठेवण्यात आली आहेत.

या आरोपांना उत्तर देताना तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयाची साफसफाई सुरू आहे आणि याच अंतर्गत जुने साहित्य हटवले जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तहसील कार्यालय परिसरातील पत्रे जुन्या तहसीलमध्ये हलवण्याचे निर्देश त्यांनी दिले होते आणि त्यानुसार एका वाहनातून ती हलवण्यात आली. पत्र्यांची कोणतीही विक्री करण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी ठामपणे केला.

सानप यांच्या आरोपांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून माध्यमांना चुकीची माहिती पुरवली जात असल्याचेही तहसीलदार लबडे यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, तहसीलदारांना दहा लाखांपर्यंतच्या साहित्याची विक्री करण्याचा अधिकार आहे आणि लवकरच योग्य प्रक्रिया पूर्ण करून भंगार साहित्याचा लिलाव केला जाईल. तसेच, उर्वरित भंगार साहित्य देखील लवकरच जुन्या तहसीलमध्ये हलवण्यात येणार आहे.

केदार सानप यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये तक्रारी केल्या आहेत आणि माहिती अधिकारातही अनेक अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या या आरोपांमागे वैयक्तिक द्वेष असण्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली.