मुंबई (वृत्तसंस्था) राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या साथीने डोके वर काढले आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये यामुळे २१२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात १८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या एका महिन्यातच तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिकमध्ये ३३ जणांना स्वाइनची लागण होऊन जीव गमवावा लागला आहे.
नऊ महिन्यात राज्यात २२०७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक नाशिकमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. १ जानेवारी ते १८ सप्टेंबर दरम्यान २१ लाख १८ हजार स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर हा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी फ्लू बरा होईपर्यंत गर्दीमध्ये जाणे टाळा, शिंकताना रुमालाचा वापर करा, कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर काढू नका, असे आवाहनही केले आहे.