तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील इलेक्ट्रीक मोटार रिवाईंडींगचे दुकान फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपी प्रशांत जगन वार्डे वय २९ रा. गोरगावले ता. चोपडा याला शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून धरणगाव पोलीसांनी मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स येथे इलेक्ट्रीक मोटार रिवाईंडींगचे दुकाने आहेत. २ मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ४ दुकाने फोडून मोटारीसाठी लागणारे तांब्याची तार चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान ही दुकाने संशयित आरोपी प्रशांत वार्डे याने फोडली असल्याचे गोपनिय माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी प्रशांत वार्डे याला मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेचार किलो तांब्याची तार हस्तगत करण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोपडा आणि अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या सुचनेनुसार सपोनि जिभाऊ पाटील, पोहेकॉ प्रवीण पाटील, चंदन पाटील यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करत आहे.

 

Protected Content