जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका व मिडवाइफ सुजाता अशोक बागूल यांना आज राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या १५ परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.
१८ वर्षांची निस्वार्थ सेवा आणि उल्लेखनीय कार्य:
गेली १८ वर्षे आरोग्य क्षेत्रात अत्यंत निष्ठेने, कष्टाने व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुजाता बागूल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे, लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, आरोग्य शिबिरे, जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमा यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.
पंतप्रधानांकडूनही कौतुक:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाकाळात परिचारिका व आरोग्य सेविकांनी केलेल्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक करत, त्यांच्या योगदानासाठी पत्राद्वारे सुजाता बागूल यांचा विशेष उल्लेख करून सन्मान केला होता. कोविड काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना यापूर्वी जिल्हास्तरीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’सह विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र असे आहे. सुजाता बागूल यांना मिळालेल्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव आरोग्य क्षेत्रात उंचावले आहे.