जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना जळगाव-पाळधी दरम्यानातील रेल्वे रूळावर घडली. अद्याप महिलेची ओळख पटलेली नसून पोलीस नातेवाईकांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव-पाळधी रेल्वे रूळावरील खांबा क्रमांक ३०१ ते १४ च्या दरम्यानात शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वृध्द महिलेने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. यात वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाळधी स्टेशन अधीक्षक मोहम्मद हुसेन अब्दूल रौफ यांना कळताच, त्यांनी तालुका पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सतिष हारनोळ यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. नंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, महिलेजवळ ओळख पटेल असे काही पोलिसांना आढळून आलेले नाही. त्यामुळे नातेवाईकांना ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीवारी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सतिष हारनोळ करीत आहेत.