रोझोद्यातील दुहेरी खून प्रकरणी एक संशयित ताब्यात

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या रोझोदा येथील वृध्द दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, रोझोदा येथे ओंकार पांडुरंग भारंबे ( वय९०) आणि त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (वय ८५) हे वयोवृध्द दाम्पत्य राहते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. शासकीय नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर येऊन कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना चेक करत असतात. या अनुषंगाने आज सकाळी डॉक्टर चेकींगसाठी आले असता त्यांना भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा थोडा उघडा दिसला. आवाज देऊनही घरातून कुणी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा हे दोन्ही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले.

या घटनेमुळे रोझोद्यासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली. भारंबे दाम्पत्य हे तसे कुण्याच्या देण्या-घेण्यात नसतांना नेमका हा प्रकार कसा घडला असावा याबाबत परिसरात एकच चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास सुरू केला. श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. तर रात्री या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, रात्री उशीरा पोलिसांनी या प्रकरणी एक संशयित ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी केली. यात या गुन्ह्याचा उलगडा झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असली तरी याबाबत आज अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Protected Content