भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव शहराच्या जवळच असलेल्या अंजनसोंडे येथील पेढे पंचक्राशीत प्रसिध्द आहेत. कोणतेही कृत्रीम घटक न टाकता शुध्द दुधाला अनेक तासांपर्यत घोटवून तयार केलेला हा पेढा जिभेवर ठेवताच विरघळतो. आणि अहाहा… आपण इतकी भन्नाट चव असलेला पदार्थ कधीही खाल्ला नसेल याची अनुभूती आपोआप आपल्याला येते. अंजनसोंडे गावातील पेढे विक्रीचा इतिहास व वर्तमान काय आहे ? याला कसे बनवितात ? याचे विक्रीतंत्र आहे तरी कसे ? येथील फेमस पेढे विक्रेते कोणते ? याबाबतचा हा विशेष वृत्तांत.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणारे अंजनसोंडे हे तसे लहानसे गाव. येथील अर्थकारण हे प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. शेती आली म्हणजे गुरे-ढोरे व पर्यायाने दुग्ध व्यवसाय आलाच. खरं तर दुध व दुग्धजन्य पदार्थ हा बहुतांश शेतकर्यांचा जोड व्यवसाय असतो. तथापि, अनेकदा दुधाला वाजवी भाव न भेटणे; डेअरीवर दिल्यानंतर याचे वेळेत पैसे न मिळणे आदी बाबींमुळे शेतकरी जेरीस येतात. याच प्रकारे अंजनसोंडे येथील पाटील बंधूंना साधारणपणे १९९३ साली असाच अनुभव आला. आपल्याकडे असणार्या दुधाला चांगला भाव भेटत नाही हे पाहून त्यांनी डेअरीला दूध देणे बंद करून यापासून तयार केलेला खवा विकण्यास प्रारंभ केला. यातूनच जवळपास २५ वर्षांपूर्वी त्यांनी पेढा विक्रीस प्रारंभ केला. आज पेढा आज अतिशय लोकप्रिय झालेला सप्तश्रुंगी पेढा होय.
या संदर्भात सप्तश्रृंगी डेअरीचे संचालक दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले की, बरेचसे हॉटेल चालक हे खव्यात साखर टाकून पेढा तयार करतात. तथापि, आम्ही कच्च्या दुधात साखर टाकून त्याला खूप वेळेपर्यंत घोटतो. अगदी याला थोडी ब्राऊन शेड येईपर्यंत घोटले जाते. तसेच महत्वाचे म्हणजे याला सरपणाच्या आगीवर घोटले जात असल्याने वेगळी चव येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सकाळी आणि सायंकाळी ही प्रक्रिया करण्यात येते. सध्या दुघाचा शॉर्टेज असल्याने दिवसाला ४०-४५ किलो पेढ्यांची विक्री होते. तर सीझनमध्ये मात्र दररोज किमान दोन किंटल इतकी विक्री होत असल्याची माहिती त्यांनी सप्तश्रुंगी डेअरीची दीपनगर येथे शाखा आहे. पंचक्रोशीसह जिल्ह्यातून या दोन्ही डेअरींमधून पेढा विकला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांना ताजा खवा व पेढा मिळत असल्याने तो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अलीकडच्या काळात मोबाईल व व्हाटसअॅप वरून देखील ऑर्डर येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांनी जोड धंद्याकडे वळावे, दुध वाढविण्याचे प्रयत्न केले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
दरम्यान, यासोबत अंजनसोंडे येथील गणेश स्वीट सेंटरचा पेढा देखील खूप लोकप्रिय आहे. सप्तश्रुंगीच्या नंतर काही काळाने हे दुकान दुरू झाले असून याला देखील ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या दुकानाचे संचालक नारायण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमचे पेढे हे घराच्या म्हशीच्या दूधांपासून तयार केलेले असतात. आमच्याकडे सध्या सुमारे २५ म्हशी आहेत. यामुळे घरचे दूध आणि याच्या जोडीला गुणवत्ता असल्याने ग्राहक आमच्याकडे येत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते देखील दुधात साखर टाकून त्याला घोटवून पेढा तयार करतात. साधारणपणे एका कढाईत १० लीटर दुध आटवले जात असून यातून अंदाजे तीन-सव्वा तीन किलो इतके पेढे तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
गणेश स्वीट सेंटरमध्ये सुध्दा पेढे आणि खवा विकला जातो. शेतकर्यांनी डेअरीला दूध दिल्यास कमी भाव मिळतो. यामुळे त्यावर प्रक्रिया केल्यास चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांनी याकडे वळावे असा सल्ला नारायण पाटील यांनी दिला आहे. ओरीजनल माल आणि क्वॉलिटी असल्याने आपले पेढे व खवा प्रसिध्द असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
म्हणजेच दूधावर प्रक्रिया करून याला खवा व पेढ्यांच्या स्वरूपात विक्री करण्याचा व्यवसाय किती उत्तम प्रकारे करता येतो हे अंजनसोंडे येथील सप्तश्रृंगी व गणेश पेढ्यांच्या लोकप्रियतेतून दिसून येते. हे ब्रँड आता इतके प्रसिध्द झाले आहेत की, अंजनसोंडे हे पेढ्यांचे गाव म्हणून प्रसिध्द झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या दोन्ही ब्रँडचे मालक असणारे दोन कुटुंब हे प्रक्रिया उद्योगातून आत्मनिर्भर झाल्याचेही आपल्याला दिसून येत आहे.
आपल्याला पेढे घ्यायचे असल्यास आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
* सप्तश्रुंगी डेअरी : मोबाईल क्रमांक-८००७४८१६३७ आणि ७६२०५३४५४२
* गणेश स्वीट सेंटर : मोबाईल क्रमांक-८८०६९९०५०८ आणि ९९२३६०६९६९
अंजनसोंडे गावातील पेढ्यांबाबतचा व्हिडीओ वृत्तांत आपण खाली पाहू शकतात.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3764549853575135
अंजनसोंडे, ता. भुसावळ येथे जायचे असल्यास गुगल मॅप्सवरील लोकेशन खाली दिलेले आहे.