शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घडवले शिवरायांचे दर्शन !

भुसावळ प्रतिनिधी । येथील मराठा समाजातर्फे आयोजित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिवाचन सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगोपांग दर्शन घडवले. इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकावर आधारित ही स्पर्धा चार गटात पार पडली. 

प्रारंभी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर माजी शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, प्राथमिक शिक्षण सभापती ॲड. तुषार पाटील, श्रीगाडगेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरूण धनपाल, मराठा समाज मंडळाचे सहसचिव योगेश जाधव उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. जगदीश पाटील यांनी शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेच्या अभिनव उपक्रमाची माहिती देऊन स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या. तसेच सादरीकरणात आवश्यक कौशल्यांचा वापर करण्याचेही आवाहन केले. 

त्यानंतर ॲड. तुषार पाटील यांनी शिवचरित्राचा आढावा घेऊन छत्रपती शिवरायांबद्दल असलेले विविध गैरसमज दूर करण्याचे आवाहन करत इतिहासकालीन पुराव्यांच्या आधारे शिवरायांच्या अतुलनीय व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. राजेंद्र आवटे यांनी नाविन्यपूर्ण स्पर्धेचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी शिवचरित्रापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक डी. के. पाटील यांनी तर आभार सहसचिव योगेश जाधव यांनी मानले. त्यानंतर शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा पार पडली. स्पर्धेदरम्यान गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ व उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिवछत्रपती पाठ्यपुस्तकावर आधारित ही अभिवाचन स्पर्धा जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात प्रथमच आयोजित करण्यात आली. अभिनव व नाविन्यपूर्ण स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कोविडच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले. 

स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रा. आर. एच. पाटील, मुख्याध्यापक ए. आर. धनपाल, नाट्यकर्मी वीरेंद्र पाटील, डॉ. अनिल पाटील, मनीषा पाटील, जे. बी. पाटील, दीपक वारांगणे व मीरा जंगले यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, सहसचिव योगेश जाधव, स्पर्धा समन्वयक डी. के. पाटील, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह विजय कलापूरे, कृष्णा शिंदे, सुमित देसले, वैभव गुंजाळ, राहूल पाटील, सचिन पाटील, प्रफुल्ल पन्हाळकर आदींनी परिश्रम घेतले. 

विजेते असे – शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा चार गटात घेण्यात आली. पाचवी व सहावीच्या पहिल्या गटात प्रथम संस्कृती योगेश गांधेले (रा. धो. हायस्कूल कुऱ्हे पानाचे), द्वितीय आर्या शाम निकम (सेंट अलॉयसियस हायस्कूल), तृतीय नम्रता अभय सूर्यवंशी (सेंट अलॉयसियस हायस्कूल). सातवी व आठवीच्या दुसऱ्या गटात प्रथम प्रणिता संदीप पाटील (कोटेचा हायस्कूल), द्वितीय उर्वशी विजय कोळी (कोटेचा हायस्कूल), तृतीय स्नेहल संदीप इंगळे (ज्ञानज्योती विद्यालय खडके). नववी व दहावीच्या तिसर्‍या गटात प्रथम गौरी सुभाष हलपतराव (सेंट अलॉयसियस हायस्कूल), द्वितीय सौरभ विकास वाणी (महाराणा प्रताप हायस्कूल), तृतीय प्रेरणा अभय सूर्यवंशी (कोटेचा हायस्कूल). अकरावी व बारावीच्या चौथ्या गटात प्रथम श्रद्धा अनिल साळवे (सु. ग. टेमानी ज्युनियर कॉलेज), मेहवीश शेख युनुस (सु. ग. टेमानी ज्युनियर कॉलेज), तृतीय खुशी अनंतकुमार वरणकर (के. नारखेडे ज्युनियर कॉलेज). या विजेत्या स्पर्धकांना शिवजयंतीनिमित्त आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. 

 

Protected Content