Home आरोग्य युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा

0
3


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर येथील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोटातील जंत-कृमींचा प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता आणि निरोगी आरोग्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर यांच्या सूचनेनुसार क्षयरोग पर्यवेक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना पोटातील जंत व कृमी होण्याची कारणे, त्यांची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, जंतनाशक म्हणून वापरण्यात येणाऱ्या अल्बेंडाझोल ४०० मि.ग्रॅ. गोळीचे महत्त्वही त्यांनी समजावून सांगितले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात आली. तसेच, आशा सेविका आरती वंजारी यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगीकारणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमाला शाळेचे संचालक मासुळे सर, मुख्याध्यापिका जयश्री मासुळे तसेच शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


Protected Content

Play sound