Home धर्म-समाज ‘लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय’च्या जयघोषात ब्रह्मोत्सवाची सांगता!

‘लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय’च्या जयघोषात ब्रह्मोत्सवाची सांगता!

0
1


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय’च्या भक्तिमय जयघोषाने दुमदुमलेले शहर, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो भाविकांची मांदियाळी अशा उत्साहपूर्ण वातावरणात पारोळा येथील श्री बालाजी महाराज संस्थानाच्या वतीने आयोजित ब्रह्मोत्सवाची भव्य पालखी मिरवणुकीने सांगता झाली. या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होऊन श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. शहरातील प्रमुख मार्गांवर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

सकाळी ८.३० वाजता श्री बालाजी मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. बाजारपेठ, मोठा महादेव चौक, मडक्या मारुती, छोटे श्रीराम मंदिर, आझाद चौक, भवानी गड, हत्ती गल्ली आणि कासार गल्लीमार्गे मार्गक्रमण करत पालखी दुपारी ३ वाजता श्रीराम मंदिरात विसावली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे औक्षण आणि आरती करून पालखीचे स्वागत केले. यावेळी पुजारी हरीश पाठक, गजेंद्र कुलकर्णी आणि दीपक पिले यांनी आरती केली.

श्रीराम मंदिरातील विहिरीत श्री बालाजी महाराजांना अमृतस्नान घालण्यात आले. यावेळी संस्थानाचे विश्वस्त, भालदार-चोपदार आणि सेवेकऱ्यांनी हातातील कंकण सोडून स्नानविधी पूर्ण केला. त्यानंतर श्री बालाजी महाराजांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. या धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सोहळ्यात श्रद्धेने सहभाग घेतला.

रात्री ९ वाजता श्रीराम मंदिरातून पुन्हा पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर आणि ‘लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पांडुरंग मंदिराचे संजय पिले सर यांच्या टाळ-मृदंगाच्या गजराने मिरवणुकीत विशेष रंग भरला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना लाडू आणि नारळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री २ वाजता पालखी पुन्हा श्री बालाजी मंदिरात पोहोचली आणि भक्तिमय वातावरणात ब्रह्मोत्सवाच्या पालखी सोहळ्याची सांगता झाली.

ब्रह्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानाच्या वतीने सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मसालेभात, पुरी, चवळीची भाजी आणि शिरा असा महाप्रसादाचा बेत होता. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाच्या नियोजनासाठी संस्थानाचे विश्वस्त गोपाल अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, अॅड. दत्ताजी महाजन आणि सुरेंद्र बोहरा यांनी विशेष परिश्रम घेतले.

पालखी मिरवणुकीदरम्यान अनेक भाविकांनी सेवेकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि दुधाचे वाटप करून सेवा दिली. त्यामुळे या धार्मिक सोहळ्यात भक्तीबरोबरच सेवाभाव आणि सामाजिक एकोपा यांचेही दर्शन घडले. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण ब्रह्मोत्सवाला विशेष रंगत आली.

या प्रसंगी संस्थानाचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी, विश्वस्त ए. टी. पाटील, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त डॉ. अनिल गुजराथी, दिनेश गुजराथी, प्रकाश शिंपी, अरुण वाणी, केशव क्षत्रिय, संजय कासार, रमेश भगवती, चंद्रकांत शिंपी, दिलीप शिरूडकर, डी. डी. वाणी, प्रमोद शिरोळे, प्रवीण कोळी, राजू चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालखी वाहून नेण्यासाठी कृष्णा बारी, बापू बारी, राजू बारी, प्रकाश चौधरी, जीवन बारी, संजय पाटील, संजय बारी आणि पांडुरंग बारी यांच्यासह हमाल बांधव, स्वयंसेवक व सेवेकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. सर्वांच्या सहकार्यामुळे ब्रह्मोत्सवाचा पालखी सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीने पारोळ्यात भक्तीचा जागर घडवून आणला. हजारो भाविकांचा सहभाग, महाप्रसादाचे वाटप आणि सेवेकऱ्यांच्या योगदानामुळे ब्रह्मोत्सवाची सांगता अविस्मरणीय ठरली.


Protected Content

Play sound