यावल, प्रतिनिधी | येथील एस.टी. आगारात कार्यरत काही वाहक आणि चालक यांच्या बेशिस्त उद्धट वागणुकीने कळस गाठला असुन, आज (दि.१) आगारातील एका वाहकाने एका विद्यार्थिनीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांच्या या असभ्य वर्तणुकीस प्रवासी चांगलेच कंटाळले आहेत. एकाच महीन्यातील प्रवाशांशी गैरवर्तणुक करण्याची ही ह्या आगारातली दुसरी घटना असुन याकडे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, आज (दि.१) एका विद्यार्थिनीला चालकाकडुन मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्यामुळे पुन्हा येथील एस.टी. आगार चर्चेत आले आहे. या घटनेची आगार व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव यांनी गंभीर दखल घेतली असुन, सदरच्या वाहकास तत्काळ सेवेवरुन परत आल्यानंतर निलंबीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
यावल येथील एसटी आगाराची बस (क्र.९९७४) या बसमध्ये पौर्णिमा मुरलीधर धांडे ही शशिकांत सखाराम चौधरी कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी यावल येथून बसने चितोडा येथे प्रवास करीत असताना महिला वाहक (बकल क्र.६६११२) हिने विद्यार्थीनी पौर्णिमा हिला मारहाण केली. याप्रकरणी येथील ग्रामस्थांनी प्रभारी आगार व्यवस्थापक भालेराव यांच्याशी संपर्क साधुन व यांना या वाहकासंदर्भात तक्रार निवेदन सादर केले असुन याप्रसंगी मुरलीधर धांडे, जयश्री पाटील, मनोज धांडे, निखील पाटील, मयुर भंगाळे, नामदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली आहे . या तक्रारीची पोलिसांनी दखल घेवुन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे.