
जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्तीसगडमधील एका राजकीय नेत्याने सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य केल्याने सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि सिंधी समाज संघटनांनी जळगावात एकत्र येऊन त्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन व पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन देत अमित बघेल या संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी काळे कपडे परिधान करून अमित बघेल यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सुरेश सुर्यवंशी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा विविधतेत एकतेचा आणि धर्मनिरपेक्षतेचा देश आहे. अशा देशात काही समाजकंटक वैयक्तिक स्वार्थ आणि विकृत मानसिकतेतून समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित बघेल यांनी झुलेलाल भगवानांविषयी वापरलेले अपशब्द अत्यंत निंदनीय असून, समाजात अशांमुळे असंतोष आणि तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३अ, २९५अ, ५०५(२) अन्वये कठोर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सिंधी एकता मंच या संघटनेनेही जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला. मंचाचे म्हणणे आहे की, अमित बघेल यांनी झुलेलाल भगवान आणि संपूर्ण सिंधी समुदायाविरुद्ध सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी केलेली वक्तव्ये धार्मिक भावना दुखावणारी आणि द्वेष पसरवणारी आहेत. त्यामुळे समाजात सौहार्द बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सिंधी समाजाने प्रशासनाकडे जोहर छत्तीसगड पार्टी आणि छत्तीसगड क्रांती पार्टीशी संबंधित व्यक्तींवर बंदी घालण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या निषेधाला जळगावातील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय घटकांनीही पाठिंबा दिला आहे.



