
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविरोधात द्वेषपूर्ण आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रावेर येथे सिंधी समाजाने संतप्त मोर्चा काढला. छत्तीसगड येथील अमित बागेल यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत समाजबांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील सिंधी व अग्रवाल समाज एकत्र येत तहसीलदार कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन गेले. मोर्चादरम्यान समाजबांधवांनी घोषणाबाजी करत संतांच्या अपमानाचा निषेध नोंदवला. नायब तहसीलदार किशोर पवार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. समाजाने निवेदनाद्वारे धार्मिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.
या वेळी माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील, महेश कोटवाणी, महेश जयसिंगानी, मोतीराम कोटवाणी, आशिष जस्वानी, विशाल अग्रवाल, दीपक रेवतानी, लखन तेलरेजा आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सिंधी व अग्रवाल समाजबांधव उपस्थित होते. मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीबाबत खात्री देण्यात आली आहे.
या मोर्चातून धार्मिक श्रद्धांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश समाजबांधवांनी दिला असून या प्रकरणी आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



