
पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पारोळा ते उंदीरखेडा मार्गावरील श्री नागेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा निवेदनं दिली, परंतु अद्याप काहीच हालचाल झाली नाही. या पार्श्वभूमीवर पारोळ्याचे तरुण विधीतज्ञ अॅड. आदित्य अशोक पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या फोटोसमोर महादेवाला नवस अर्पण करत रस्ता करण्याची मागणी केली आहे.
अॅड. पाटील यांनी पारोळा ते उंदीरखेडा आणि श्री नागेश्वर मंदिर रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आपला आवाज बुलंद केला आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीअभावी खराब अवस्थेत असून, नागरिक, शेतकरी आणि वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच हा रस्ता ‘अखेरच्या घटका मोजत आहे’, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.
शासन आणि जनप्रतिनिधींकडे वारंवार निवेदनं देऊनही काही फरक न पडल्याने अॅड. आदित्य पाटील यांनी आता ‘महादेवाला साकडे’ घालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या छायाचित्रांसमोर महादेवाला नवस करून, “हा रस्ता तयार झाला तर मी दहा नारळांचा नवस फेडीन,” असे जाहीर केले आहे. या नवसामुळे स्थानिकांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
श्री नागेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन असून, त्याची स्थापना अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झाल्याचे सांगितले जाते. या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भाविकांना मंदिरात पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामस्थ आणि भक्त यांचीही हीच मागणी आहे की शासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना कराव्यात.
अॅड. आदित्य पाटील हे सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताच्या विषयांवर काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पारोळा कुटीर रुग्णालय, टोल नाका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित प्रश्नांवर लढा दिला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक साधारण नागरिकांना न्याय मिळाल्याचे उदाहरणे आहेत. आता त्यांच्या या नवसाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष रस्त्याच्या प्रश्नाकडे वेधले जाईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या घटनेनंतर पारोळा परिसरात तसेच सोशल मीडियावर ‘वकिल साहेबांचा महादेवाला नवस’ ही चर्चा रंगली आहे. शासन आणि स्थानिक आमदारांनी या नवसाला प्रतिसाद देत तातडीने रस्ता तयार करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



