भुसावळ येथे ‘स्टे’ असतांना जमीन मोजमापासाठी आल्याने तणाव

WhatsApp Image 2019 11 21 at 19.53.20

भुसावळ, प्रतिनिधी | येथील समता नगरातील जमीन बेकायदेशीररित्या मोजणीसाठी रेल्वेचे अधिकारी आले असता तेथील रहिवाश्यांनी यास विरोध केला आहे. तसेच जनआधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे यांनी उच्च न्यायालयाने स्टे दिलेला असतांना अशी कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

आज २१ नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तोमर हे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे समता नगर येथे भूमी अभिलेख अधिकारी यांच्यासोबत आले व जमिनीचे मोजमाप करण्याचे कारण सांगून बेकायदेशीररित्या आत शिरले. त्यांनी तेथील रहिवाशांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली असता नागरिकांनी त्यांना सांगितले की, या जमिनीबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पिटीशन दाखल असून पुढील तारखेपर्यंत म्हणजेच चार डिसेंबर पर्यंत आहे तीच परिस्थिती ठेवण्याचे स्पष्ट संकेत रेल्वे प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे मोजमाप करु शकत नाही असे सांगितले असता संबंधित अधिकारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व तेथील उपस्थित लोकांना दमदाटी करून पांगविण्याचा प्रयत्न करीत केला असल्याचे गटनेते उल्हास पगारे यांनी कळविले आहे. अशाप्रकारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून मनमानी पद्धतीने गोरगरीब लोकांना बेघर करण्याचे काम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी रेल्वे अधिकाऱ्याच्या या कृतीबद्दल समता नगर मधील नागरिकांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा बेकायदेशीर कारवाईच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content