जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवाजीनगर परिसरासह वेगवेगळ्या भागात गोमांस विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकीलाला धमकल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून वाद झाला. हा वाद वाढतच गेल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. ही घटना शुक्रवार, २१ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी रात्री 9 वाजता शहर पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवाजीनगरातील उमर कॉलनीत गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याने शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केले होते. या सोबतच गोवंशाची कत्तल केल्यानंतर उर्वरीत शिंगांसह कातडी गोणीत भरुन ते दुचाकीवर घेऊन जाणाऱ्यालाही अटक केले होते. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. तिची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवार, २१ जून रोजी त्यांना न्यायालयात आणले होते. त्यावेळी दोन्ही गटाचे ४०० ते ५०० कार्यकर्ते न्यायालय परिसरात आले होते. यादरम्यान ॲड. निरंजन चौधरी हे दुसऱ्या एका वकिलांशी बोलत असताना त्यांच्यात नदीम मलिक या बोलू लागला. त्या वेळी मध्ये बोलू नको, असे सांगितले असता त्याने ‘तुला पाहून घेईल’ असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून वाद वाढत गेला. त्यामुळे दोन गट एकमेकांसमोर आले. न्या. एम.एम. बढे व न्या. केंद्रे यांच्या दालनाकडे जाणाच्या मार्गात असलेल्या जिन्याजवळ हा प्रकार घडला. या वेळी एकमेकांवर दोन्ही गट ओरडत असल्याने वाद चांगलाच वाढला.
या प्रकरणातील संशयितांना न्यायालयात आणणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही गटात वाद वाढल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थिथीत नसल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे जमाव पांगला.
या प्रकरणात संशयितांची बाजू मांडण्यासाठी वकील पत्र घेत असल्याने आपणास रोखण्यात आल्याचे ॲड. इम्रान शेख यांनी सांगितले. यात ॲड. निरंजन चौधरी व ॲड. केदार भुसारी हे आपल्याला वकीलपत्र घेण्यापासून रोखत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून वाद वाढत गेला.
न्यायालय परिसरात जोरजोरात आवाज येत असल्याने सुरू असलेले कामकाज काही वेळ थांबविण्यात आल्याचे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी सांगितले. असे प्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांची आवश्यकता असून येथे येणाऱ्यांची नोंद ठेवली गेली पाहिजे, असे ॲड. काबरा यांनी सांगितले.
या प्रकरणी ॲड. निरंजन चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात आपल्याला धमकावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच नदीम गफ्फार मलिक यांनीही शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एकमेकांविरुद्ध देण्यात आलेल्या या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.