सुयोग्य आहार ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली – क्रांतिवीर महिंद्रकर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान, जळगाव, अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय आणि मराठी विज्ञान परिषद जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य आणि निसर्गोपचार’ या विषयावर क्रांतिवीर महिंद्रकर यांचे व्याख्यान डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री क्रांतिवीर महिंद्रकर म्हणाले की सुयोग्य आहार ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे आहारात फळे, भाज्या आणि नियंत्रित प्रक्रिया केलेले अन्न यांचा जर  समावेश केला तर अनेक रोगांचा होणारा त्रास टाळता येऊ शकतो. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता आहारावरच अवलंबून असते. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील.  किशोरवयीन मुलींना आणि स्त्रियांना कायम प्रोटीन्स, कॅल्शियम, लोहाने भरपूर अशा सत्त्वयुक्त संतुलित आहाराची गरज असते. साठीनंतर आहाराचे प्रमाण  नियंत्रित करायला हवे. शरीराच्या वाढीसाठी, होणारी झीज भरून काढण्यासाठी, शक्तीसाठी आहाराची गरज असते. हा आहार नैसर्गिक असावा. तो कारखान्यात यंत्रांनी तयार केलेला नसावा.सुयोग्य जीवनशैली ही दीर्घायुष्याकडे जाण्याचा मार्ग दर्शवते.  योग आणि आहार याद्वारे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. निसर्गोपचाराद्वारे अनेक व्याधींना परतवून लावता येते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौरी राणे होत्या.  त्यांनी आपल्या  अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनी आणि स्त्रियांच्या आरोग्याबद्दल  मार्गदर्शन केले.  त्या म्हणाल्या, आजतागायत मानवी शरीर, त्यातील अवयव त्याचे कार्य जसे होते तसेच आहे, पण माणसाच्या आहारविहारात मात्र गेल्या पन्नास वर्षांत फार वेगाने बदल झाले आहेत. मनुष्याची ताकद कमी होते आहे, कारण आपला आजचा आहार कृत्रिम आणि निःसत्व आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि कुटुंबातील महत्त्वाच्या घटक असलेल्या महिला आपल्या आहाराकडे म्हणावे तसे लक्ष देत नाहीत.  त्यांनी संतुलित आहार घेणे आणि हिमोग्लोबिनची पातळी उच्च राखणे खूप महत्त्वाचे आहे.

याप्रसंगी अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक राणे उपस्थित होते. प्राध्यापक अभिजीत सरोदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  त्यामध्ये त्यांनी निसर्गोपचाराची आवश्यकता आणि नैसर्गिक आहाराचे महत्त्व  कथन केले प्रा. मंगेश  किनगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .  प्रा. पूजा टाक यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास  सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.

Protected Content