जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारावर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली अवलंबणारे देशातील एक प्रमुख राज्य आहे. सध्या राज्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू असून, डीएपी या रासायनिक खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र (नायट्रोजन) आणि ४६ टक्के स्फुरद (फॉस्फेट) हे मुख्य अन्नद्रव्ये असतात. मात्र, या खताची संभाव्य कमतरता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आतापासूनच त्याला पर्यायी खतांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
डीएपी खताला उत्तम पर्याय म्हणून एसएसपी (Single Super Phosphate) हे खत सर्वाधिक उपयुक्त ठरू शकते. एसएसपीमध्ये १६ टक्के स्फुरद, सल्फर (गंधक) आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपीचा वापर अधिक फायदेशीर ठरतो, कारण गंधक तेलबियांच्या वाढीसाठी आणि तेलाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. डीएपीच्या एका ५० किलोच्या गोणीऐवजी, २५ किलो युरिया आणि ५० किलो एसएसपी खतांचा एकत्रित वापर केल्यास तो डीएपीला एक चांगला आणि संतुलित पर्याय ठरू शकतो.
याव्यतिरिक्त, एनपीके (NPK) प्रकारातील विविध संयुक्त खते देखील पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यामध्ये एनपीके १०:२६:२६, एनपीके २०:२०:०:१३, एनपीके १२:३२:१६ आणि एनपीके १५:१५:१५ यांसारख्या खतांचा समावेश होतो. या खतांच्या वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश (पोटॅशियम) या तीनही प्रमुख अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढण्यास मदत मिळते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या गरजेनुसार या संयुक्त खतांचा विचार करावा.
टीएसपी (Triple Super Phosphate) हे आणखी एक प्रभावी स्फुरदयुक्त पर्यायी खत आहे. यामध्ये ४६ टक्के स्फुरदाचे प्रमाण आढळते, जे डीएपीमधील स्फुरदाच्या बरोबरीचे आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी जर २५ किलो युरिया आणि ५० किलो टीएसपीचा वापर केला, तर तो देखील डीएपीला एक चांगला पर्याय ठरू शकतो आणि स्फुरदाची गरज पूर्ण करू शकतो.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाने नम्र आवाहन केले आहे की, खरीप हंगामामध्ये केवळ डीएपी खतावर पूर्णपणे अवलंबून न राहता, बाजारात उपलब्ध असलेल्या या विविध पर्यायी खतांचा योग्य नियोजन करून वापर करावा. यामुळे पेरणीच्या वेळी खतांची संभाव्य कमतरता जाणवणार नाही आणि उत्पादनात कोणताही अडथळा येणार नाही. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कृषी सेवा केंद्र तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.