औरंगाबाद (वृत्तसंस्था) कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद शहरातील समर्थ नगर येथील घरावर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी दगडफेक करत गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेमुळेच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी स्वत:चा शिवस्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामाही दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आलेला नाही. ते पुन्हा एकदा कन्नड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी चिंचोली लिंबाजी येथील सभेत बोलताना जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती.
लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेक शिवसैनिकांना पटलेली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत तो रोष शिवसैनिक व्यक्त करत होते. त्यात नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भर पडणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मिळविलेल्या मतांमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. ज्यांच्यामुळे विजय मिळाला, त्यांना मदत व्हावी म्हणून एमआयएमने कन्नड मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही.