होय…राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म पाठवला होता- खडसेंचा गौप्यस्फोट

khadse e1550572684596

भुसावळ प्रतिनिधी । निवडणूक अर्ज भरण्याच्या कालखंडात राष्ट्रवादीने आपल्यासाठी एबी फॉर्म पाठवून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिली होती, मात्र आपण ती नाकारली असल्याचा गौप्यस्फोट एकनाथराव खडसे यांनी केला आहे. ते येथील जाहीर सभेत बोलत होते.

भुसावळचे महायुतीचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत नाथाभाऊंनी जोरदार टोलेबाजी केली. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांमधील नाट्यमय घटनांवरही त्यांनी भाष्य केले. खडसे म्हणाले की, राष्ट्रवादीने आपल्यासाठी एबी फॉर्म पाठविला होता. तसेच आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाची ऑफरदेखील केली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला. मात्र ज्या पक्षाने आपल्याला आजवर बरेच काही दिले त्याला सोडण्याचा विचार स्वप्नातदेखील आला नसल्याने आपण याला साफ नकार दिल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. आपल्याला तिकिट दिले जाणार नसल्याची माहिती तीन महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय सावकारे हे आपल्यासोबत अडचणीच्या काळातदेखील असल्याने त्यांना विजयी करण्याचे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content