बिग ब्रेकींग : शिवजयंतीच्या मिरवणूकीवर अज्ञातांकडून दगडफेक; पोलीसांकडून धरपकड सुरू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील वराड गल्लीत शिवजयंती निमित्त काढलेल्या मिरवणूकीवर अचानकपणे  दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी व नागरीक जखमी झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवार २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील इंदीरा नगरातून सायंकाळच्या सुमारास मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री ८ वाजता गावातील वराड गल्लीतील धार्मीक स्थळाजवळून जात असतांना अचानक मिरवणूकीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आले. या मिरवणूकीवर दगडफेक आणि विटा फेकून मारल्याने मिरणूकीत सहभागी असलेले नागरीक आणि काही पोलीस कर्मचारी असे ५ ते ६ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांच्यासह पोलीस पथक शिरसोली गावात दाखल झाले आहे. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content