जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा फाटा येथे अधिकृत कंपनीच्या नाव आणि लोगोचा वापर करून बोगस रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता केलेल्या कारवाईत एकुण १ लाख ५१ हजार ६९६ रुपयांचा खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अधिकृत कंपनीच्या नावाने बोगस रासायनिक खत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला मिळाली. त्यानुसार जळगाव तालुक्यातील नांद्रा गावात शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये ५० किलो वजनाच्या पिवळ्या रंगाच्या पिशवी त्यावर ॲग्री नेम ऑरगॅनिक मॅनर नाव लिहिलेल्या एकुण १५२ रासायनिक खताने भरलेल्या पिशव्या असा एकूण १ लाख ५१ हजार ६९६ रूपयांचा बोगस रासायनिक खातांचा साठा आढळून आला. पथकाने पुर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास उत्तमराव बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार येथील दक्ष कमल ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत दशरथ पाटील रा. शहादा जि. नंदुरबार, खतांचे पुरवठादार भरतभाई आणि जोधा पंपानिया दोन्ही रा. आनंद, गुजरात, कंपनीचे विक्री प्रतिनिधी दिनेश गिरधर पाटील रा.शहादा जळगाव, विक्री प्रतिनिधी महेश बुद्धपाल माटे आणि अल्ताफ शेख मोहम्मद हनीफ धोनी रा.जळगाव यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शर्मा करीत आहे.