ठाकरे सरकारच्या कृतीमुळे राज्याची बदनामी- देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । छत्रपतींच्या महाराष्ट्रातील हे सर्वात घाबरट सरकार असल्याचा टोला मारत सरकारच्या कृत्यामुळे राज्याची देशभरात बदनामी झाली असल्याचा आरोप आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला आहे. अर्थात, यासोबत आता राजकारणही तापू लागलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली, अशी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेलं नाही. आपल्या विचारांचा विरोध करणारे, व्यक्ती असतील, पत्रकार असतील या सर्वांना दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अवैधपणे होत आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याचा महाराष्ट्राचा किंवा मुंबई पेलिसांचा अवमान होतो, त्याचं समर्थन करता येत नाही. पण, सरकारच्या अशा कृतीचंही समर्थन करता येत नाही. या कृतीमुळे उभ्या देशात महाराष्ट्राची बदनामी होतेय.

फडणवीस पुढे म्हणाले की, काल-परवापर्यंत ते बांधकाम तिथे होतं, तेव्हा कारवाई केली जात नाही. पण, अचानक कुणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते. मग अन्य अवैध बांधकामावर सरकार का कारवाई करत नाही? केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. राज्य सरकारला शोभणारी नाही. महाराष्ट्रात एकप्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे, असेही ते म्हणाले.

Protected Content