जळगाव तालुक्यातील आव्हाणे ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन सुरूच (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । आव्हाणे गावातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ता नादुरूस्त झाला असून शेतकऱ्यांना या रस्त्याने ये – जा करणे मुश्‍कील झाले आहे. या वाळु माफियांविरूध्द प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कानाडोळा होत असल्यामुळे अखेर आज सकाळपासून पंचायत समितीचे सदस्य ॲड. हर्षल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून ग्रामस्थांनी गिरणा नदीपात्रात बसून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

या प्रश्‍नी प्रत्यक्ष कारवाई केल्याशिवाय व जिल्हाधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून वाळू माफियांमार्फत नेहमी अवैध वाळू वाहतूक केली जात असते. या वाहतुकीमुळे नेहमी वाळू वाहून नेणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या मार्गावरील वाळू वाहतूक बंद करावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु तहसिलदारांसह प्रशासनाने या प्रश्‍नाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आज सकाळी आक्रमक पवित्रा घेत थेट येथील गिरणा नदी पात्रात जल समाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य ॲड. हर्षल चौधरी हे करीत असून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात उडी घेतली आहे.

या आंदोलनाचे वृत्त समजताच तहसिलदारांसह तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावून आले व त्यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत व ते या प्रश्‍नी यशस्वी तोडगा काढत नाहीत तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2766087650304540/

Protected Content