


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । SIR अभियान अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयपूर्ण करण्याच्या उद्देशाने भुसावळ येथे राज्यातील पहिलाच समन्वय व मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. शासन, प्रशासन आणि प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शंकांचे निरसन करणे आणि कामकाजात अधिक सुसूत्रता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. त्यांनी SIR अभियानात कार्यरत असलेल्या BLO, BLA, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक, निवडणूक कर्मचारी तसेच इतर संबंधित घटकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. यावेळी उपस्थितांनी मांडलेल्या विविध समस्या आणि सूचनांवर त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. या मार्गदर्शन मेळाव्याची संकल्पना भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नितु पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला मंत्री संजय सावकारे यांनी तत्काळ प्रतिसाद देत अल्पावधीत या उपक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे SIR अभियानात कार्यरत असलेल्या विविध घटकांना प्रथमच एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करण्याची, कामकाजातील अडचणी मांडण्याची आणि समन्वय साधण्याची प्रभावी संधी मिळाली.
कार्यक्रमात तेजेंद्र महाजन आणि हिरानंद मूलचंदानी यांनी SIR अभियानातील विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले तसेच प्रत्यक्ष कामकाजात येणाऱ्या विविध अडचणींवर सखोल चर्चा झाली. या मार्गदर्शनामुळे BLO आणि त्यांच्या सहाय्यकांना कामकाजाची प्रभावी उजळणी होऊन निवडणूक प्रक्रियेतील अनेक महत्त्वाच्या बाबी अधिक स्पष्ट झाल्या. या मेळाव्याला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (अण्णा) बाविस्कर, जिल्हा सचिव परिक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष गोलू पाटील व प्रशांत पाटील, शहराध्यक्ष किरण कोलते व संदीप सुरवाडे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितु पाटील तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हा सचिव जीवन महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भुसावळ तालुक्यातील सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, BLO, BLA, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक, निवडणूक शाखेतील कर्मचारी आणि संबंधित विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री संजय सावकारे यांनी उपस्थितांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेत संवाद साधला. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. नितु पाटील यांनी केली, तर सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले. जीवन महाजन यांनी आभार मानले. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना प्रशिक्षण, समन्वय आणि तातडीचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



