


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील रेल्वे कामगार संघटनांच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनला मोठा धक्का बसला आहे. सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड ए. के. तिवारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये जाहीर प्रवेश केल्याने रेल्वे कर्मचारी वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भुसावळ येथील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या “कामगार भवन” येथे आयोजित विशेष प्रवेश सोहळ्यात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर, मंडळ अध्यक्ष कॉम्रेड इम्राहिम खान आणि मंडळ सचिव कॉम्रेड बापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात कॉम्रेड ए. के. तिवारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रवेशामुळे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनवर विश्वास व्यक्त करत संघटनेत प्रवेश केला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी नेतृत्व आणि संघटनात्मक बळ आवश्यक असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. भुसावळ रेल्वे विभागात या घडामोडीमुळे कामगार संघटनांमधील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



