


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराच्या पुनर्बांधणीला गती देण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष मंदिर परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. विठ्ठल-रुख्माईच्या कृपाआशीर्वादाने आणि शासनाच्या मदतीने मंदिराचे भव्य नवनिर्माण लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर त्यांनी भडगाव येथे वारीमध्ये सहभागी होत परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची भेट घेऊन पुनर्बांधणीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिर हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात असून, त्याला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनासह संबंधित शिखर संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाशीही त्यांनी पुनर्बांधणीच्या पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली. दुर्घटनेच्या वेळी तत्परतेने कार्य करून मोठे नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन विभागाने केलेल्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भडगाव येथे वारीदरम्यान आमदार अनिल पाटील यांनी परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीद्वारे संत प्रसाद महाराज यांच्याशी संवाद साधत वाडी संस्थानच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन करण्यासाठी शासन निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही दिली. दुर्घटनेमुळे लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अनिल पाटील यांनी यावेळी संत प्रसाद महाराजांना माहिती देताना सांगितले की, त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विधानमंडळातही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा विषय उपस्थित करून आपत्कालीन निधीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन या विषयावर सकारात्मक असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर संत प्रसाद महाराज यांनी विठ्ठल माऊलीची कृपा आणि लाखो वारकरी-भाविकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नसल्याचे सांगितले. आमदार अनिल पाटील यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते दिंडीसह पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या प्रसंगीही मोठ्या संख्येने वारकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



