यावल प्रतिनिधी | प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी यांना निवेदन देण्यात आले.
यावल शहरातील वाढीव २० टक्के नळपट्टी रद्द करण्यात यावी. २७ कॉलनी परिसरातील आपण दिलेल्या नळकनेक्शनला पाणी न देता पावती आलेली असून ती रद्द करण्यात यावी. संभाव्य कोरोना काळ लक्षात घेता तत्काळ नगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात करण्यात याव्यात. अपंग बांधवांना तात्काळ नगरपालिकेकडून मिळणारं मानधन मिळावं. तडवी कॉलनी, गणपती नगर, विरार नगर, फालक नगर यातील रस्ते तयार करण्यात यावेत.
यावल येथील तलावाच्या कामाची चौकशी करुन या प्रकरणात काय चौकशी केली किंवा संबंधित अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही याबाबत जनतेसमोर खुलासा करावा. यावल शहरातील डांबरीकरण रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेदार यांना अपात्र घोषित करण्यात येऊन पुढील चौकशी करावी. शहरांमध्ये सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी.
प्रभाग क्रमांक ९ मधील सुंदर नगर, आसाराम नगरमधील गटारीचे काम लवकर मंजूर करण्यात यावे. यावल स्मशानभूमीत नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी नेमण्यात यावा. यावल शहरात भाजीपाला विकणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी योग्य जागा देण्यात यावी. घरकुल प्रकरणातील लोकांच्या तक्रारी लक्षात घेता आपण कार्यालयातून नेमणूक असलेला कर्मचारी लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असतो त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
हळकाई खडकाई नदीत तात्काळ स्वच्छता करण्यात यावी तसेच परिसरातील भागात नदीकडून संरक्षक भिंत बांधण्यात यावी. सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यक्रमासाठी हॉल बांधण्यासाठी नगरपालिकेने भूखंड द्यावा. खुल्या जागेवर गार्डन तयार न करता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह तयार करण्यात यावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय उभे करण्यात यावे. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका हॉल नगरपालिकेच्या वतीने देण्यात यावा. वसुंधरा योजनेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांसंदर्भात चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कार्यवाही व्हावी.
प्रभाग क्रमांक ०३ मधील पाण्याची टाकी तयार असल्याने तात्काळ पाण्यात देण्यात यावे. क्रीडा मैदान नगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे. आदी. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी यांना निवेदन देण्यात आले.
मागण्या १५ दिवसाच्या आत पूर्ण न होऊन योग्य ती कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सादर करण्यात आलेल्या निवेदनाचे पत्रकावर प्रहार जनशक्ती पक्ष युवक यावल शहराध्यक्ष राहुल कचरे, सागर चौधरी, फिरोदोस खान, अतुल बारी, जावेद पटेल, हितेश देशमुख, आसिफ खान, राहुल पवार, अमर शेख, जावेद खान आणि राजेश तडवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.