फैजपूर प्रतिनिधी । इंधन आणि रासायनिक खते दरवाढीच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कैलास कडलक यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व शेतमशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून गती देण्यात आली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी- बियाणे, खतांसाठीच्या आर्थिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तयारी केली जात आहे. परंतु केंद्रशासनाकडून रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात व येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच गेल्या वर्षांपासून कोरोना प्रादूर्भाव त्याचप्रमाणे खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान होऊनही उत्पादनात घट आली आहे. शिवाय शेत मालाला योग्य भाव न मिळल्यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केमिकल व फर्टिलायझरचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे सर्व खत कंपन्याच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे सांगितले होते. परंतु यंदाचा खरीप हंगाम तोंडावर असतांनाच खत कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ केली असून बियाण्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे खते व बियाण्यांच्या विक्रीत, किंमतीत, पुरवठ्यात मोठा काळा बाजार होऊ नये, यासाठी या लिंकिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथकाची नेमणूक करावी. तसेच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शाकीर शेख, युवक शहराध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवक शहर उपाध्यक्ष सागर चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.