वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत करा : गुलाबराव देवकरांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्या वाढदिवशी कोणताही कार्यक्रम साजरा न करता गरजूंना मदत करण्याचा संकल्प केला असून आपल्या चाहत्यांनाही हेच करण्याचे आवाहन केले आहे.

दुष्काळी स्थितीमुळे निर्णय

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस २० जानेवारी रोजी आहे. खरं तर, दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे त्यांनी या वाढदिवसाला कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन न करण्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी एका पत्रकान्वये आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

चाहत्यांना आवाहन

या पत्रकात गुलाबराव देवकर यांनी म्हटले आहे की, यंदा अपुर्‍या पावसामुळे सर्वच कृषी उत्पादनात मोठी घट झाली आहे. जे कृषी उत्पादने शेतकर्‍यांच्या हाती आले, त्याला ही शासनाकडून पाहिजे तसा बाजार भाव न मिळाल्याने राज्यासह संपूर्ण जिल्हाभरात मोठया दुष्काळाचे सावट आले आहे. ही बाब लक्षात २० जानेवारी रोजीच्या आपल्या वाढदिवशी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कोणताही समारंभ आयोजित करू नये. वाढदिवस निमित्त एखादा समारंभ आयोजित करणे, कुठल्याही प्रकारची भेटवस्तू आणू नयेत. त्याऐवजी आपण शालेय विदयार्थ्यांकरीता वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणावे. सदरचे सर्व शैक्षणिक साहित्य यानंतर गरजू विद्यार्थाना वितरीत करण्यात येईल, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.

दिवसभर संपर्क कार्यालयात उपस्थिती

या पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जेष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व स्नेहीजन आपण सर्वच जण माझ्यावर खूप प्रेम करतात. आपण सर्वच जण समारंभ करण्यासाठी , शुभेच्छा देण्यासाठी खूप उत्सूक असाल याची मला खात्री अन् विश्‍वास आहे. आपल्या शुभेच्छा अन् आशिर्वाद हीच माझ्या वाटचालीची खरी शिदोरी आहे. या शिदोरीच्या बळावरच माझी आजवरची वाटचाल झाली असून पुढे ही होणार आहे. वाढदिवसाला आपण आपल्या जळगावातील संपर्क कार्यालयात ( श्रम सहकार , आकाशवाणी चौक ) सकाळ पासूनच उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी याच ठिकाणी फक्त सदिच्छा भेट घेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दयाव्यात किंवा शैक्षणिक साहित्य देवून माझ्या संकल्प व उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन या पत्रकात गुलाबराव देवकर यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content