भुसावळ प्रतिनिधी । येथे आज वंचित बहुजन आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले असून यांचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
आज वंचित बहुजन आघाडीतर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, पंचशील नगरातील दलित वस्तीतील अनेक गरजू पंचशील नगर वासियांना अनेक दिवसापासून घरकुल मिळविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केला असून यातील अनेक प्रकरणे जवळपास वर्ष दोन वर्षापासून प्रलंबित आहे. यासोबत पंचशील नगर भागातील शौचालयांची झालेली दुरावस्था व पिण्याचे पाणी यासह विविध समस्यांबाबत विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली परंतु अद्याप ही समस्या सोडविण्यात नगर पालिकेला यश आले नाही.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने येत्या दहा दिवसात समस्या त्वरित सोडवाव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १९ ऑक्टोबरला आमदार व नगराध्यक्ष यांच्या घरासमोर मोर्चा व निदर्शने करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर विनोद सोनवणे,जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, दिनेश इखारे जिल्हा महासचिव, देवदत्त मकासरे, संजय सुरडकर जिल्हा सचिव, दिपक सुरवाडे, पंकज बोदडे, प्रणव सुरवाडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.