शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे दुर्घटना टळली

 

सातारा: वृत्तसंस्था । कोरेगाव तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेटनजीक रूळावर बैलगाडी अडकली होती. त्याचवेळी एक भरधाव रेल्वे सातारच्या दिशेने येत होती. प्रसंगावधान दाखवत तेथे असलेल्या शेतकऱ्यांनी लाल झेंडे फडकावले. त्यामुळे रेल्वे वेळीच थांबवणे शक्य झाले आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील रेल्वे गेटनजीक ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचे चाक अचानक तुटले व बैलगाडी रूळांवरच फसली. ही बैलगाडी तिथून तातडीने हटवणेही शक्य नव्हते. त्यामुळेच मोठाच पेचप्रसंग उद्भवला. इतक्यात तिथे काही शेतकरीही दाखल झाले होते. बैलगाडी रूळांवरच होती.

दरम्यान, कराड रेल्वे स्टेशनवरून सातारच्या दिशेने जाणारी एक विशेष गाडी येत असल्याचे लक्षात आले बैलगाडी रुळांवर असल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते हे उपस्थित सर्वांच्याच लक्षात आले. प्रसंगावधान दाखवत काही शेतकऱ्यांनी हातात लाल बावटे घेतले आणि फडकवण्यास सुरुवात केली. काही शेतकरी रूळांवरूनच लाल झेंडे फडकावत कराडच्या दिशेने धावत गेले. अर्धाकिलोमीटरवर गाडी येईपर्यंत शेतकरी लाल झेंडे दाखवत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि वेळीच रेल्वे थांबवली गेली. खूप मोठी दुर्घटना टळली.

त्यानंतर ट्रॅक्टरच्या मदतीने रूळांवर अडकलेली बैलगाडी बाहेर काढण्यात आली व अवघ्या काही मिनिटांत रेल्वे त्या ठिकाणाहून साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली.

कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी बुधवारी रेल्वे भुयारी मार्गाबाबत बैठक होती. या बैठकीनंतर विकास थोरात यांच्यासह शेतकरी मसूर मार्गे कोरेगावकडे निघाले होते. यावेळी रेल्वे गेटजवळ ते आले असता अचानक एका ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीचे चाक तुटले व बैलगाडी रूळांवरच मध्यभागी अडकली. यावेळी रेल्वे गेटमन बैलगाडी पुढे घेण्यास सांगत असला तरी विरुद्ध बाजूकडचे बैलगाडीचे चाक तुटले असल्यामुळे बैलगाडी त्याच जागी उभी असल्याचे पाठीमागे असणाऱ्या विकास थोरात यांच्यासह शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

यावेळी झाला प्रकार गेटमनला सांगत लाल झेंडे घेत सर्व शेतकरी रेल्वे रुळांवरून कराडच्या दिशेने पळत सुटले. तोपर्यंत रेल्वे ४०० मीटर अंतरावर आली होती. लाल झेंडे हाती घेत कराडच्या दिशेने धावणाऱ्या विकास थोरात, जयसिंग जाधव, अजय बापू कदम, सूरज कदम, अमोल पाटील यांच्यामुळे रेल्वेचा वेग कमी करण्यात आला व अवघ्या शंभर फूट अंतरावर येऊन रेल्वे थांबली.

Protected Content