श्रीकांत ट्रेलर यांचे व्यवसाय प्रमाणपत्र तीन महिन्यांकरिता निलंबित

जळगाव (प्रतिनिधी) विना क्रमाकांच्या ट्रॉलीमधून गौणखनिजाची वाहतुक होत असल्याचे आढळून आल्यामुळे जिल्ह्यात २० वाहनांवर परिवहन विभागाच्यावतीने कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत ट्रेलर (रा. करगाव, ता. चाळीसगाव) यांचे ट्रेलर विना नोंदणी ग्राहकांच्या ताब्यात देवून व गौणखनिज वाहतुकीस वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र 90 दिवसांकरीता निलंबित करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना जळगाव जिल्ह्यात विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अशा वाहनांविरूध्द उप प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

 

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विना क्रमांकाच्या ट्रॉलीमधून गौणखनिजाची वाहतूक होत असल्याने आढळून आल्यामुळे अशा 20 वाहनांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच विना क्रमांक ट्रेलर व उत्पादने विना क्रमांकाची वाहने ग्राहकांच्या ताब्यात दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. ट्रेलर उत्पादकांनी ट्रॉलींवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अधिकृतपणे क्रमांक घेवूनच त्या ट्राली ग्राहकांच्या ताब्यात द्याव्यात, अन्यथा ट्रॉली उत्पादकांच्या चुकांमुळे नाहक ग्राहकांना दंडात्मक /दिर्घकालीन वाहन निलंबनासाख्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

तरी जिल्ह्यातील सर्व ट्रेलर उत्पादकांना कळविण्यात येते की, त्यांनी वितरक नोंदणी न करता ट्रेलर ग्राहकांच्या ताब्यात दिल्यास त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी व व्यवसाय प्रमाणपत्र, वाहन निलंबनासारखी कटू कारवाई टाळावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी कळविले आहे.

Protected Content