अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज स्मृतीदिनानिमित्त जगभरात अभिवादन केलं जात असताना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेतील गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी या प्रकाराची कडक शब्दांत निंदा केली असून द्वेष भावनेने करण्यात आलेल्या या गुन्ह्याची स्थानिक प्रशासनाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ब्रॉन्झ धातूमध्ये बनवलेल्या गांधीजींच्या या सहा फुटी पुतळ्याचे वजन ६५० पौंड (२९४ किलो) असून उत्तर कॅलिफोर्निया राज्यातील दाविस शहरातील सेंट्रल पार्कमध्ये तो बसवण्यात आला होता. अज्ञात समाजकंटकांनी या पुतळ्याची तोडफोड केली असून २७ जानेवारी रोजी तो सकाळी जमिनीवर तुटलेल्या अवस्थेत पडलेला पार्कच्या एका कर्मचाऱ्याला आढळून आला. येथील स्थानिक वृत्तपत्र डेविस एन्टप्राईजने सर्वप्रथम याबाबत वृत्त दिलं होतं. या वृत्ताची दखल नंतर भारतीय माध्यमांनी घेतली.

मोडतोड झालेला पुतळा संबंधित ठिकाणाहून हटवण्यात आला असून एका सुरक्षित जागी ठेवण्यात आला आहे. दाविस शहराचे काउन्सिलमॅन लुकास फ्रेरिक्स यांनी याबाबत माहिती दिली. पुतळ्याची केव्हा आणि कोणत्या कारणासाठी तोडफोड झाली याचा तपास केला जात आहे. तसेच ही बाब आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली असल्याचे डेव्हिसच्या पोलीस विभागाचे उपप्रमुख पॉल डॉरोशोव्ह यांनी सांगितलं आहे.

महात्मा गांधींचा हा पुतळा भारत सरकारने दाविस शहराला भेट दिला होता. स्थानिक महापालिकेने तो चार वर्षांपूर्व येथील सेन्ट्रल पार्कमध्ये बसवला होता.

Protected Content