गुरुचा उपग्रह युरोपावर पाणी असल्याचा नासाचा दावा

europa moon

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | आपल्या सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरुच्या युरोपा या उपग्रहावर पाणी असल्याचा दावा नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने केला आहे. नासाला संशोधनादरम्यान या उपग्रहावर पाण्याचे बाष्प आढळून आले आहे. या दाव्यामुळे युरोपावर पाण्याचा मोठा स्त्रोत असलेला सुमद्रही अस्तित्वात असू शकतो, असेही नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

 

यासंदर्भात नासाने एक ट्विट केले असून यामध्ये युरोपाच्या बर्फाच्छादित पृष्ठभागावरुन अधूनमधून फवाऱ्यांप्रमाणे पाणी बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे. याचे पुरावे संशोधकांना मिळाले असल्याचे नासाने म्हटले आहे. मात्र, या पाण्याचे मॉलेक्युलस मोजण्यात आलेले नसल्याने याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही. जीवसृष्टीसाठी लागणारे आवश्यक घटक या उपग्रहावर असू शकतात, अशी शक्यता ताज्या संशोधनावरुन व्यक्त करण्यात आली आहे.

पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे. मात्र, अशी जीवसृष्टी अस्तित्वात येण्यासाठी तिथे पृथ्वीप्रमाणे पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे असे पाण्याचे अस्तित्व शोधण्याच्या दृष्टीने वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. चंद्राच्या ७९ चंद्रांपैकी एक असलेला युरोपा हा चंद्र किंवा उपग्रह त्यासाठी महत्वाचा ठरला आहे. ४० वर्षांपूर्वी व्हायोजर अंतराळ यानाने या युरोपाची जवळून काही छायाचित्रे टिपली होती. त्यावेळी युरोपावरील बर्फाच्या पृष्ठभागावर करड्या रंगाच्या काही भेगा आढळून आल्या होत्या. या भेगांमधून अधून-मधून पाण्यासारखे फवारे बाहेर पडत असल्याचे संशोधकांचे म्हणणे होते. त्यानंतर आलिकडेच झालेल्या अधिकच्या संशोधनात हे फवारे पाण्याचे फवारे असावेत, असा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे युरोपा हा नासाच्या संशोधकांसाठी जीवसृष्टीच्या आणि पर्यायाने पाण्याच्या संशोधनकार्यात महत्वाचा ग्रह ठरला आहे.

Protected Content