प्लाझ्मा थेरपी मृत्यू रोखू शकत नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात अनेक ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातो आहे . अनेक ठिकाणी या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याची विनंतीही केली जाते आहे . प्लाझ्मा थेरपीतून कोरोनाकाळात अनेकांना आशादायक चित्रं दिसत होतं. परंतु, ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर कडून मात्र प्लाझ्मा थेरपीचे हे दावे फेटाळून लावले गेले आहेत. १४ राज्यांच्या ३९ रुग्णालयातील ४६४ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्यानंतर आयसीएमआर तज्ज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत.

आरसीएमआरनं केलेल्या एका अभ्यासात प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत असल्याचं म्हटलंय. एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचं आयसीएमआरनं स्पष्ट केलंय.

या अभ्यासासाठी ‘इंटरवेन्शन’ आणि ‘कंट्रोल’ असे दोन ग्रुप बनवण्यात आले होते. इंटरवेन्शन ग्रुपमध्ये २३५ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला. कंट्रोल ग्रुपमध्ये २२९ लोकांवर प्लाझ्माऐवजी ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट’चा वापर करण्यात आला. दोन्ही ग्रुपचा २८ दिवसांपर्यंत अभ्यास करण्यात आला. याचा परिणाम म्हणून प्लाझ्मा देण्यात आलेले ३४ रुग्ण किंवा १३.६ टक्के रुग्ण दगावले. ३१ रुग्ण किंवा १४.६ टक्के रुग्ण ज्यांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आलेली नाही त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही ग्रुपमध्ये ज्यांच्यावर अभ्यास करण्यात आला होता अशा १७-१७ रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.

संशोधनानुसार प्लाझ्मा थेरपीचा थोडा वापर नक्कीच दिसून आला. श्वासोच्छवास घेताना समस्या किंवा थकवा कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर झाला. परंतु, ताप किंवा खोकला यांसारख्या लक्षणांवर मात्र प्लाझ्मा थेरपीचा वापर होऊ शकला नाही.

Protected Content