बालिका अत्याचार खटल्यात दोषसिध्द; १४ रोजी होणार शिक्षेची सुनावणी 

जळगाव प्रतिनिधी ।  किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने ११ वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले. १४ सप्टेबर रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे. न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरु आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, १८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाष हरचंद महाजन (५५, ता.भडगाव)  याने पीडित बालिकेला किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन कलम ३७६ (२)(आय)(एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले.

यात पीडितेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन वाईट कृत्याच्या परिणामाबाबत समाजात योग्य संदेश जावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. न्यायालयासमोर आलेले पुरावे व अ‍ॅड.बोरसे यांचा युक्तीवाद पाहता बुधवारी न्यायालयाने आरोप महाजन याला दोषी ठरविले. १४ सप्टेबर रोजी शिक्षेची सुनावणी केली जाणार आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.

Protected Content