दिव्यांग बांधवांच्या समस्यांबाबत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे निवेदन !


यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, यावल तालुक्याच्या वतीने तालुक्यातील दिव्यांग बांधवांना ग्रामीण पातळीवर भेडसावणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करणवाल यांना निवेदन देण्यात आले. यावल पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या कार्यक्रमादरम्यान हे निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी आमदार अमोल जावळे आणि आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांसाठी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर, सीईओ मीनल करणवाल, आमदार अमोल जावळे आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिव्यांग बांधवांना त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे) तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

‘प्रहार’ संघटनेकडून आभार प्रदर्शन
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीईओ मीनल करणवाल, आमदार अमोल जावळे व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत हे आश्वासन मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले. या पुढाकारामुळे यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.