भुसावळ प्रतिनिधी । उधार घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून तरूणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील वांजाळा रोडवर उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जितेंद्र कदम (वय-२४) रा. गजानन महाराज मंदीराजवळ दत्त नगर भुसावळ या तरूणाने रोहित भंगाळे या तरूणाच्या वाढदिवसासाठी दोन हजार रूपये दिले होते. जितेंद्र कदम याने उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने संशयित आरोपी राहित भंगाळे याने ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जितेंद्र कदम याला शहरातील वांजोळा रोडच्या बाजूला रेणूका माता मंदीराजवळ नेऊन शिवीगाळ करून संशयित आरोपी रोहीत भंगाळे, गोपाल भंगाळे, तेजस बोरोले, गोविंदा बोरोले सर्व रा. श्रीराम नगर भुसावळ यांनी डोक्यात बिअरीची बाटली मारली तर गोपाळ भंगाळे याने जितेंद्रच्या पोटात डाव्या बाजूला व पायाच्या मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जितेंद्र कदम यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनास्थळी सपोनि अनिल मोरे, पो.ना. समाधानपाटील यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक रमण सुरळकर करीत आहे.